कोबाल्ट ब्लू हे मौज प्रकाशनाचं सचिन कुंडलकर यांचं पुस्तक हातात पडलं त्याला एक महिना होऊन
गेला. सचिन कुंडलकर म्हणजे मराठीत 'गंध' आणि हिंदीत 'अय्या' हे माहीत होतं. पैकी गंध
ही त्रिकथा अतिशय आवडलेली. पण या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ पाहूनही काही अंदाज
येईना. साहजिकच हे प्रकरण काय असावं या कुतुहलाने ते उचललं गेलं. फक्त ९० पानांची ही
कादंबरी एका बैठकीत वाचून पूर्ण होते. मात्र त्यातल्या पात्रांचा विचार काही काळ तरी
पाठ सोडत नाही.
या
पुस्तकाची कथा ही तीन तरुण मुलांची आहे. बहीण, भाऊ, आणि त्यांच्या घरी आलेला एक मुलगा
यांची. हा चक्क एक प्रेमत्रिकोण असला तरी कादंबरीच्या पहिल्या काही पानांतच जो धक्का
बसतो, तेच कुंडलकरांचं यश म्हणा अथवा वैशिष्ट्य म्हणा.
पुस्तकाच्या
पहिल्या अर्धात तनयचा स्वसंवाद आहे. आणि दुसरा अर्ध अनुजाच्या बाजूने लिहिलेला आहे.
ही दोघं मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेली असली तरी त्यांचे विचारआचार सर्वस्वी
भिन्न आहेत, व्यक्त होण्याचे त्यांचे असे स्वतःचे मार्ग आहेत, आवडीनिवडी आहेत. आणि
त्यांच्या आईवडिलांना त्याची सुतराम कल्पना नाही. इतकंच कशाला, त्या दोघांनाही परस्परांच्या
या विचारांची चाहूल नाहीय. अशा एकटेपणाच्या रेषेवरून चालताना या मनस्वी मुलांच्या आयुष्यात
एक मुलगा येतो. ओळख, मैत्री हे टप्पे झरझर पार करून ही दोघं त्याच्यात गुंततात. हा
तिसरा मुलगा तनय आणि अनुजा यांच्या नजरेतून दिसत राहतो. गोष्ट या तिसर्यामुळे आकाराला
येते, त्यामुळे खरं पाहता तोच हिचा नायक आहे. मात्र त्याची बाजू काय, या दोघांचं त्याच्यासाठीचं
स्थान काय, त्याच्या लेखी नातं, सहजीवन म्हणजे काय याचा फक्त अंदाजच करता येतो.
आणि
म्हणूनच पुस्तक संपलं तरी कथा संपलेली नाही, असा अनुभव कुंडलकर देत राहतात. नातं दोघांचं
असतं. मात्र नात्यातून दोघांना जे हवं असतं ते एकाकार असतंच का? नसतं तेव्हा 'सहवासाचं
रूपांतर संबंधात होतंय.. संबंध बंधनात बदलत जात आहेत', हे नेमकं कोणत्या क्षणी समजतं?
ते अखेरपर्यंत समजलंच नाही, तर मग नातं ज्याच्याशी जोडलं त्या व्यक्तीला आपण ओळखलं
हे म्हणण्याला काय अर्थ राहतो? या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे ही कथा आहे.
पुस्तकाचं
शीर्षक - कोबाल्ट ब्लू.. व्हॅन गॉगचा हा कोबाल्ट ब्लू अवकाशाचं प्रतिनिधित्व करणारा.
कथेच्या नायकासारखाच न दिसताही भोवताल व्यापून असणारा. हा रंग संवादाचा, बुद्धीमत्तेचा,
तर्काचा असाही मानला जातो. हे तीनही गुणविशेष या पात्रांमध्ये आहेत. ही मुलं संवेदनाशील
आहेत, पण भावनाशील नाहीत.. रंगवलेलं चित्र विस्कटल्याचं दु:ख त्यांना जरूर आहे. ते
का विस्कटलं हा प्रश्नही त्यांना पडलेला आहे. पण त्याचं उत्तर शोधताना ती दोघंही कोणाला
दोषी ठरवत नाहीत. आणि ते विस्कटलेलं चित्र बाजूला ठेवून कोरा कॅनव्हास पुढ्यात घेण्याची,
निरसलेल्या नात्याचा स्वीकार करून आयुष्य पुढे जगण्याची उमेदही त्यांच्यात आहे.







0 comments:
Post a Comment