Wednesday, August 19, 2015

कॅम्पफायर - वसंत लिमये

काही छंद असे असतात, जे एकदा जडले की आयुष्यभर साथ सोडत नाहीत. त्यातून गिर्यारोहणाचा छंद हा तर उत्सुकता, थरार, आव्हान या सगळ्यांनीच परिपूर्ण. त्यामुळे एकदा डोंगरवाटांवर पावलं उमटली की ती पुनःपुन्हा त्या दिशेने वळतच राहतात. कॅम्पफायर हे पुस्तक म्हणजे वसंत वसंत लिमये यांच्या अशाच पाऊलखुणांच्या नोंदी आहेत. आयआयटीचे विद्यार्थी असलेल्या लिमयेंनी गेली तीस चाळीस वर्षं हा छंद व्यावसायिक पद्धतीने जपला, जोपासला. पहिल्याच लेखात नोंदवलेल्या 'हाईकचं पुन्हा नाव काढणार नाही', या निश्चयापासून ते तोवर अनुल्लंघ्य असलेल्या रौद्र अशा कोकणकड्यावर केलेल्या पहिल्यावहिल्या चढाईपर्यंतचे अनेक अनुभव गोळा केले आणि यावर सातत्याने लेखनही केलं. त्या लेखांचा हा एक देखणा असा संग्रह आहे. सह्याद्रीतल्या डोंगरकड्यामधून सुरू झालेल्या या मोहिमा पुढे हिमालय आणि त्यानंतर युरोपातल्या शिखरांपर्यंत पोहोचल्या. या सार्‍या काळात त्यांना अनेक माणसं भेटली. त्यापैकी काहींचे व्यक्तीचित्रणही या पुस्तकात आहे. विद्यार्थ्यांची आणि ट्रेकर्सची अशी जी खास भाषा असते तीही यात आहे. जीवावर बेतलेले प्रसंग आहेत. साध्या सोप्या भाषेमुळे हे पुस्तक खरोखरच शेकोटीभोवतीच्या गप्पांची आठवण करून देतं.

मराठी, इंग्रजीत अशा विषयांवर आणि अनुभवांवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. मग कॅम्पफायरचं वेगळेपण कशात आहे? तर ते पुस्तकाच्या मांडणीतही आहे आणि लेखकाच्या लेखनातही आहे. अभ्यासोनि प्रगटणार्‍या व्यक्तीच्या ठायी जी इतिहासाची जाण असते आणि वर्तमानाचे भान असते ते "कॅम्पफायर"मध्ये गिर्यारोहणाच्या संदर्भाने सर्वत्र दिसून येते. निव्वळ चढाया करण्यापुरता हा छंद मर्यादित न ठेवता त्यांनी जागतिक कीर्तीच्या गिर्यारोहकांचे अनुभव वाचले, अभ्यासलेही. हे शास्त्र आणि तंत्र प्रगत होत असताना कोणकोणते बदल होत आहेत आणि त्यांचा भारतात कसा उपयोग होईल हे समजून घेतले. या सगळ्या जमवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक कल्पनाही प्रत्यक्षात आणल्या. मग ती गडावर बारमाही पाणीसाठा मिळावा म्हणून तिथे बंधारा बांधण्याची फसलेली योजना असो की 'कोकणकडा चढायचाच' या आणि अशा यशस्वी झालेल्या अनेक इतर कल्पना असोत. यातूनच मग ताम्हिणी घाटामधली 'गरुडमाची' ही निसर्ग, साहसी मोहिमा आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांची सांगड घालणारी संस्थाही त्यांनी सुरू केली, तरुण मुलामुलींसाठी शिबिरं आयोजित केली, वेळोवेळी काढलेल्या छायाचित्रांची प्रदर्शनं भरवली.

पुस्तकाबद्दल बोलताना त्याचं बोलकं मुखपृष्ठ आणि लेखांसोबतची रेखाचित्रे यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. पुस्तक हातात घेतल्यावर त्यावरच्या डोंगरचित्राच्या खरखरीत स्पर्शासोबतच एका ट्रेकरचं अनुभवविश्व उलगडायला लागतं. निलेश जाधवांनी तयार केलेलं हे मुखपृष्ठ आणि सोबत पुस्तकातली रेखाटनं यामुळे कॅम्पफायरचं वाचन चित्रदर्शी झालं आहे. किंबहुना लिमये हे स्वतः उत्तम छायाचित्रकार असूनही त्या छायाचित्रांऐवजी ही रेखाटनं घेतल्यामुळेच हे पुस्तक वेगळं वाटतं. अधूनमधून आढळणार्‍या संपादनाच्या चुकांनी मात्र या सार्‍या अनुभवाला किंचितसं गालबोट लागलं आहे. अर्थात त्यामुळे मूळ विषयाला कुठेही बाधा येत नाही, हेही खरंच.

सहज म्हणून एखादी गोष्ट करून पाहावी आणि तिने पाहता पाहता सारे आयुष्यच बदलून टाकावं, हे तसं क्वचितच दिसून येतं. कॅम्पफायर हा वसंत वसंत लिमये यांचा ट्रॅव्हलॉग म्हणजे हीच दुर्मीळ असलेली गोष्ट आहे. लिमये यांच्यासाठी हे क्षेत्र सारा हौसेचा मामला असं न राहता त्यापलीकडे गेलं आहे, अनेकपटींनी महत्त्वाचं झालं आहे, हेच यातून वाचकांपर्यंत पोहोचतं.

मिसेस लॉजिक - आनंद ठाकूर

नवचैतन्य प्रकाशनचं मिसेस लॉजिक हे श्री आनंद ठाकूर यांनी लिहिलेलं आइन रँड या रशियन लेखिकेचं संक्षिप्त चरित्र आहे. आइन रँड म्हणजे ॅटलास श्रग्ड आणि फाऊंटनहेड या दोन जग्द्विख्यात कादंबर्यांची लेखिका. या दोनही कादंबर्यांचा अनुवाद मराठी भाषेत प्रसिद्ध झाला आहे. ऑब्जेक्टिव्हिझम या संपूर्ण नव्या, स्वतंत्र आणि जगावेगळ्या तत्त्वज्ञानाची मांडणी आईन रँड हिने स्वतःच्या लेखनामधून केली. तिची लेखनकारकीर्द ही अवघ्या काही कादंबर्यांची. तरीही एकंदर इंग्रजी साहित्यामध्ये आईनचं महत्त्व अतुलनीय असं आहे. केवळ साहित्यातच नाही, तर एकूणच तर्क, बुद्धिमत्ता, आणि व्यक्तिवाद या संदर्भातले तिचे विचार जगभरात अभ्यासले जातात. अशा या लेखिकेचा परिचय ठाकूर यांच्या या छोटेखानी पुस्तकातून होतो.
श्री आनंद ठाकूर यांनी या पुस्तकाचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात ॅलिस रोझेनबाऊम ऊर्फ आइन रँडचा संघर्ष आणि उत्कर्ष, दुसर्या भागात तिच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि तिला लाभलेले अनुयायी, आणि तिसर्या भागात तिचं उतारवय आणि अखेरची काही वर्षं आली आहेत. अतिशय कुशाग्र बुद्धीची ही मुलगी लहानपणापासूनच सुस्पष्ट विचारांची होती. एखादी नवीन कल्पना समजून घेताना, नवा विषय शिकताना, मानवी मुल्यं आत्मसात करताना किंवा नाकारतानाही तिच्या या गुणाचे पुनःपुन्हा प्रदर्शन झालेले दिसते. या सुस्पष्टतेमुळेच आपल्या मैत्रिणी कशा असाव्यात, कोणती पुस्तकं वाचावीत, मोठ्या लोकांशी कसे बोलावे याबद्दल ती जागरूक होती. तल्लख ग्रहणशक्ती असल्यामुळे तिच्या वयाच्या मुलींशी मैत्री करणं तिला नेहमीच अवघड जात असे. नंतरच्या आयुष्यातही तिच्या बहुतेक नात्यांबाबत हेच दिसून आलं. लहान वयापासूनच अवतीभवती स्वातंत्र्याचा संकोच होताना पहिल्यामुळे तिच्या स्वातंत्र्याबद्दलच्या कल्पना फार लवकर नक्की झाल्या. इतकंच नाही, तर प्रतिकूल परिस्थिती असूनही तिच्या विचारांवर आणि इच्छाशक्तीवर त्याचा परिणाम तिने होऊ दिला नाही. याचमुळे रशियातून बाहेर पडून व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या अमेरिकेत स्थायिक व्हायचं हेही तिने निश्चित केलं होतं. इतकंच नव्हे तर त्याप्रमाणे अथक कष्ट करून ती अमेरिकेची नागरिक झालीदेखील. हा सगळा प्रवास या पुस्तकातून वाचता येतो.

आइन रँड या लेखिकेच्या लेखनाची, व्यक्तिमत्त्वाची अनन्यसाधारण अशी वैशिष्ट्यं होती. तिने संपूर्णपणे स्वतंत्र असं व्यक्तिवादी तत्त्वज्ञान निर्माण केलं. ती तिच्या संपूर्ण आयुष्यभर ते तत्त्वज्ञान स्वतः आचरणात आणत राहिली. इतकंच नाही, तर तिच्या प्रत्येक लेखनातून तिने त्याचा पाठपुरावा केला. विशेष म्हणजे यासाठी तिने ललितलेखनाचा साचा निवडला, क्लिष्ट होऊ शकेल असं आपलं तत्त्वज्ञान तिने कादंबरीतल्या पात्रांमधून, त्यांच्या संवादांमधून मांडलं. हेच नव्हे तर तिच्या कादंबर्यांवर सिनेमेही प्रदर्शित झाले. तिचं लेखन करोडो लोकांपर्यंत पोहोचवण्यात या गोष्टीचा फार मोठा वाटा आहे. तिच्या कादंबर्यांनी, विशेषतः फाऊंटनहेड यातल्या मुख्य पात्राने अनेकांना जगण्याचा दृष्टीकोन दिला, त्यांच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पनांमध्ये आमुलाग्र बदलही घडवला. आदर्शवाद आणि व्यवहार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, व्यक्ती ही जगातली मूलभूत संस्था असून तिच्या हिताला बाधा आणणे समाजासाठी नुकसानकारक आहे, असे क्रांतिकारक विचार आईनने जगात रुजवले. अशी ही एकमेवाद्वितीय म्हणावी अशी लेखिका घडली कशी, जगली कशी हे कुतूहल शमवण्याचं काम ठाकूर करतात. तर दुसरीकडे ज्यांनी तिची पुस्तकं अजून वाचली नसतील, अशा वाचकांच्या मनात कुतूहल जागं करण्याचं कामही ते करतात.
केवळ स्वतःच्याच संकल्पनांवर पराकोटीचा दृढविश्वास असणार्या आईनने मानवी नातेसंबंध, त्यांच्यामध्ये असलेलं भावनांचं स्थान याला फारसं महत्त्व दिलं नाही. याचमुळे उतारवयात तिच्या सगळ्याच नात्यांमधून ती एकटी पडत गेली, नाकारली गेली. सार्वजनिक आयुष्यात अनेक शिष्य, प्रशंसक मिळूनही खाजगी आयुष्यात मात्र ती बहुधा एकटीच राहिली. आईन रँड हिचा प्रभाव हा फक्त वाचकांपुरता मर्यादित नव्हता. तिचं तत्त्वज्ञान एखाद्या पंथाप्रमाणे स्वीकारून त्याचा अंगिकार करणार्या अनुयायांचाही यात समावेश होता. मिसेस लॉजिक या पुस्तकामध्ये या घटनांबद्दल मात्र फारच मोजकी माहिती येते. आईन रँड हिच्या हयातीतच या सगळ्यातून उभी राहिलेली चळवळ आणि तिची व्याप्ती याची पूरेपूर क्ल्पना देण्यात हे पुस्तक किंचित कमी पडतं. त्याचबरोबर काहीशी रुक्ष विचारसरणी असलेल्या आईनने लेखनासाठी कादंबरीसारखा रंजक साहित्यप्रकार का निवडला असावा, हा प्रश्नही अनुत्तरित राहतो.
परकीय लेखकांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन त्यांच्या आयुष्याचा आढावा घेण्यारी स्वतंत्र पुस्तकं मराठी भाषेत क्वचित आलेली आहेत. अशा मोजक्या पुस्तकांमध्ये ठाकूर यांच्या मिसेस लॉ़जिक या पुस्तकाचा समावेश अवश्य करायला हवा.

आनंदयात्री - मोहन गोरे

श्री मोहन गोरे यांनी स्वतःबद्दल लिहिलेलं आनंदयात्री हे यातलं पहिलं पुस्तक आहे. आत्मचरित्र लिहिण्यामागचा उद्देश असतो तो आपलं आयुष्य कसं गेलं हे पडताळून पाहणं. त्यातून जे बरेवाईट अनुभव मिळाले ते लोकांशी वाटून घेणं. मोहन गोरे यांनीही असेच वेगवेगळे प्रसंग लहान लहान प्रकरणांमधून वाचकांपुढे मांडले आहेत. अत्यंत सोपी साधी अशी भाषा आणि प्रत्येक प्रसंगाला खुलवून सांगण्याची शैली यांच्यामधूनच या उमद्या व्यक्तिमत्त्वाचीही ओळख होत जाते.




सधन कुटुंबात जन्माला येऊनही मोहन गोरे यांचं पुढचं आयुष्य मात्र खूपच कष्टात गेलं. एका अनपेक्षित संकटामुळे घरची सांपत्तिक स्थिती पराकोटीची खालावली आणि संपूर्ण गोरे कुटुंबावरच अडचणींचा काळ ओढवला. त्यावेळच्या आठवणी सांगताना लेखनात कडवटपणा आला तर खरं म्हणजे नवल नाही. पण या सगळ्या लेखनामध्ये तक्रारीच्या सूराचा जरासा लवलेशही आढळत नाही. किंबहुना अगदी मनमोकळेपणी ते त्या काळातल्या घटनांबद्दल लिहितात. अंगभूत कुतूहल आणि मुळातली कुशाग्र बुद्धी, हे त्यांचे दोन्ही पैलू सुरुवातीच्या काही प्रकरणांपासूनच जाणवत राहतात. त्या काळात सामाजिक जबाबदारीचं उत्तम भान जपणारी जी अनेक माणसं गोरे यांना भेटली, त्यांनी गोरे यांच्या या बुद्धिमत्तेला, व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात मोलाचा हातभार लावला. त्यांच्याबद्दलही त्यांनी लिहिले आहे. शालेय जीवनापासून सुरू झालेलं हे स्मरणरंजन पुढे त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचाही आढावा घेतं.

पुस्तक वाचायला घेतानाच जाणवते ती लेखकाची निर्मळ विनोदबुद्धी. हजरजबाबीपणा आणि विसंगती टिपणार्या मिश्किल कोट्या यांच्यामुळे एखाद्या अवघड प्रसंगालाही ते सहजपणे सामोरे जातात. गोरे यांच्या वृत्तीचं वर्णन करायचं तर निराशेला जराही वाव देता मनाजोगतं घडेपर्यंत चिकाटीने आणि सचोटीने प्रयत्न करत राहणं असं करावं लागेल. या वृत्तीमुळेच आयुष्यात नवनव्या संधी मिळवत, कधी त्या निर्माण करत, तर कधी अडथळ्याचंच संधीमध्ये रूपांतर करत त्यांनी स्वतःची प्रगती साधली. या सगळ्याचं वर्णन आनंदयात्रीमध्ये आलं आहे. एक उदाहरणच द्यायचं तर त्यांनी पहिलीच नोकरी ज्या प्रकारे मिळवली त्या प्रसंगाचं देता येईल. तो सारा प्रसंगच लेखकाचा आयुष्याकडे पाहायचा दृष्टीकोन किती सुदृढ आणि कणखर आहे, हे सांगणारा आहे. तिथून पुढे त्यांनी कायमच आपत्तीचा संधीत आणि संधीचा यशात कायापालट करून दाखवला. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की कठीण काळातून जाणारा एखादा वाचक या पुस्तकाचं बोट धरून नक्कीच सकारात्मक होण्याकडे वाटचाल करू शकेल.

नोकरीच्या आणि नंतर व्यवसायाच्या काळात गोरेंना भेटलेली अनेक स्तरांवरची, अनेक स्वभावांची, देशोदेशीची असंख्य माणसं हा या पुस्तकाचा अजून एक विशेष. तुमच्या आयुष्यात येणार्या, आणि विशेषतः हाताखालच्या माणसांशी तुम्ही कसे वागता, यावरून तुम्ही कसे आहात याचाही अदमास येत असतो. एखाद्या भेटीतही माणसाच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची हातोटी प्रत्येकालाच साधते, असं नाही. पण मोहन गोरे याही गुणाला अपवाद नाहीत. आपले सहाध्यायी किंवा सहकारी असोत, एखादा कामगार असो, की ग्राहक म्हणून सामोर्या आलेल्या कंपनीचा सर्वेसर्वा असा मालक असो, यातल्या प्रत्येकाशीच गोरे उत्तम संबंध राखून आहेत. यातले अनेकजण नंतर त्यांचे स्नेही बनले, ते गोरे यांच्या स्वभावामुळेच.

अशा या कर्तबगार, जगन्मित्र असामीची ही आनंदयात्रा सार्या जगभरात यशाचे ठसे उमटवत निरंतर सुरू आहे. हे पुस्तक अनेक अंगानी प्रेरित करते. व्यक्ती म्हणून जगावे कसे, व्यावसायिक म्हणून वागावे कसे, हे दाखवते. इतकंच नाही, तर कोणतंही पाठबळ नसेल तरीही जिद्द, कष्ट आणि आशावाद यांच्या जोरावर स्वतःच्या आयुष्याचे शिल्प खरोखरीच घडवता येतं, हे दाखवून देते.