Wednesday, August 19, 2015

कॅम्पफायर - वसंत लिमये

काही छंद असे असतात, जे एकदा जडले की आयुष्यभर साथ सोडत नाहीत. त्यातून गिर्यारोहणाचा छंद हा तर उत्सुकता, थरार, आव्हान या सगळ्यांनीच परिपूर्ण. त्यामुळे एकदा डोंगरवाटांवर पावलं उमटली की ती पुनःपुन्हा त्या दिशेने वळतच राहतात. कॅम्पफायर हे पुस्तक म्हणजे वसंत वसंत लिमये यांच्या अशाच पाऊलखुणांच्या नोंदी आहेत. आयआयटीचे विद्यार्थी असलेल्या लिमयेंनी गेली तीस चाळीस वर्षं हा छंद व्यावसायिक पद्धतीने जपला, जोपासला. पहिल्याच लेखात नोंदवलेल्या 'हाईकचं पुन्हा नाव काढणार नाही', या निश्चयापासून ते तोवर अनुल्लंघ्य असलेल्या रौद्र अशा कोकणकड्यावर केलेल्या पहिल्यावहिल्या चढाईपर्यंतचे अनेक अनुभव गोळा केले आणि यावर सातत्याने लेखनही केलं. त्या लेखांचा हा एक देखणा असा संग्रह आहे. सह्याद्रीतल्या डोंगरकड्यामधून सुरू झालेल्या या मोहिमा पुढे हिमालय आणि त्यानंतर युरोपातल्या शिखरांपर्यंत पोहोचल्या. या सार्‍या काळात त्यांना अनेक माणसं भेटली. त्यापैकी काहींचे व्यक्तीचित्रणही या पुस्तकात आहे. विद्यार्थ्यांची आणि ट्रेकर्सची अशी जी खास भाषा असते तीही यात आहे. जीवावर बेतलेले प्रसंग आहेत. साध्या सोप्या भाषेमुळे हे पुस्तक खरोखरच शेकोटीभोवतीच्या गप्पांची आठवण करून देतं.

मराठी, इंग्रजीत अशा विषयांवर आणि अनुभवांवर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. मग कॅम्पफायरचं वेगळेपण कशात आहे? तर ते पुस्तकाच्या मांडणीतही आहे आणि लेखकाच्या लेखनातही आहे. अभ्यासोनि प्रगटणार्‍या व्यक्तीच्या ठायी जी इतिहासाची जाण असते आणि वर्तमानाचे भान असते ते "कॅम्पफायर"मध्ये गिर्यारोहणाच्या संदर्भाने सर्वत्र दिसून येते. निव्वळ चढाया करण्यापुरता हा छंद मर्यादित न ठेवता त्यांनी जागतिक कीर्तीच्या गिर्यारोहकांचे अनुभव वाचले, अभ्यासलेही. हे शास्त्र आणि तंत्र प्रगत होत असताना कोणकोणते बदल होत आहेत आणि त्यांचा भारतात कसा उपयोग होईल हे समजून घेतले. या सगळ्या जमवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून अनेक कल्पनाही प्रत्यक्षात आणल्या. मग ती गडावर बारमाही पाणीसाठा मिळावा म्हणून तिथे बंधारा बांधण्याची फसलेली योजना असो की 'कोकणकडा चढायचाच' या आणि अशा यशस्वी झालेल्या अनेक इतर कल्पना असोत. यातूनच मग ताम्हिणी घाटामधली 'गरुडमाची' ही निसर्ग, साहसी मोहिमा आणि व्यावसायिक प्रशिक्षण यांची सांगड घालणारी संस्थाही त्यांनी सुरू केली, तरुण मुलामुलींसाठी शिबिरं आयोजित केली, वेळोवेळी काढलेल्या छायाचित्रांची प्रदर्शनं भरवली.

पुस्तकाबद्दल बोलताना त्याचं बोलकं मुखपृष्ठ आणि लेखांसोबतची रेखाचित्रे यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. पुस्तक हातात घेतल्यावर त्यावरच्या डोंगरचित्राच्या खरखरीत स्पर्शासोबतच एका ट्रेकरचं अनुभवविश्व उलगडायला लागतं. निलेश जाधवांनी तयार केलेलं हे मुखपृष्ठ आणि सोबत पुस्तकातली रेखाटनं यामुळे कॅम्पफायरचं वाचन चित्रदर्शी झालं आहे. किंबहुना लिमये हे स्वतः उत्तम छायाचित्रकार असूनही त्या छायाचित्रांऐवजी ही रेखाटनं घेतल्यामुळेच हे पुस्तक वेगळं वाटतं. अधूनमधून आढळणार्‍या संपादनाच्या चुकांनी मात्र या सार्‍या अनुभवाला किंचितसं गालबोट लागलं आहे. अर्थात त्यामुळे मूळ विषयाला कुठेही बाधा येत नाही, हेही खरंच.

सहज म्हणून एखादी गोष्ट करून पाहावी आणि तिने पाहता पाहता सारे आयुष्यच बदलून टाकावं, हे तसं क्वचितच दिसून येतं. कॅम्पफायर हा वसंत वसंत लिमये यांचा ट्रॅव्हलॉग म्हणजे हीच दुर्मीळ असलेली गोष्ट आहे. लिमये यांच्यासाठी हे क्षेत्र सारा हौसेचा मामला असं न राहता त्यापलीकडे गेलं आहे, अनेकपटींनी महत्त्वाचं झालं आहे, हेच यातून वाचकांपर्यंत पोहोचतं.

0 comments:

Post a Comment