माचीवरला बुधा आणि पवनाकाठचा धोंडी या गोनीदांच्या दोन कादंबर्या नुकत्याच वाचून झाल्या. थोडी निराशाच झाली. कदाचित इतकी सुटसुटीत, भाबडी आयुष्यं आता खेडगावातल्या लोकांचीही राहिली नाहीत या जाणिवेमुळे असेल. गोनीदांचं या दोन पुस्तकातलं लेखन 'भारावल्या माणसाने आयुष्य पाहावं' असं वाटलं. त्यामुळेच मग त्यांच्याबद्दल आणखी कुतूहल वाटून नॉनफिक्शन प्रकारातली त्यांची अजून काही पुस्तकं मागवली.. त्यापैकी हे एक, त्रिपदी.
त्रिपदीमध्ये त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लहानलहान लेख आहेत. काही जिवलग व्यक्तींवर लिहिलेले. काही स्वत:वर लिहिलेले. या लेखांना तसा एकच एक आकार नाही. काहीकाही तर चक्क अनुदिनी लिहावी तशा प्रकारचेही आहेत. पण सर्वच लेखांमधून जाणवते ती त्यांची भाषेवरची माया आणि तिच्यावरचं प्रभुत्त्वही. त्रिपदी काय आहे? तर गोनीदांचं आयुष्यावरचं प्रेम. स्नेह्यांबद्दलच्या आठवणी. गडकोटांबद्दलचा जिव्हाळा. त्यांनी लिहिलेल्या काल्पनिकांची मुळंही. बुधा, धोंडी, चिंधी, ही त्यांची पात्रंही. लेखक गो नी दाण्डेकरांमधले गोनीदा यांचं हे पुस्तक आहे. त्यांच्या भारावलेपणाचा उलगडा करणारं.
त्रिपदीमधले गोनीदांनी स्वतःबद्दल लिहिलेले दोन लेख अगदी विशेष आवडण्यासारखे आहेत. पहिला, 'माझ्या कुटुंबात मी'. कोणत्याशा दिवाळीअंकासाठी स्वतःबद्दल तिर्हाईताप्रमाणे पण खुसखुशीत शैलीत मांडलेला हा लेख मुळातून वाचावा इतका छान आहे. यात आयुष्यभर नादिष्टपणे भटकणारे 'तुम्ही' आहेत नि पत्नीशी अमूक एखादी भाजी कशी केली असता चविष्ट होते, यावर मतभेद असणारेही 'तुम्ही' आहेत. आणि या कुटुंबाचे प्रमुखच नाही तर जावई-मुलींसुद्धा सारेच कसे 'तुम्हीं'च्याच जातकुळीचे आहेत याचेही किस्से आहेत.
'हिडणें माझें दिवाणें' हा एक अजून लेख. शीर्षकाप्रमाणेच गोनीदांनी स्वतःच्या भटकण्याच्या छंदाचा घेतलेला हा मागोवा आहे. सह्यप्रेमींना यातलं वाक्य न् वाक्य आपलंसं वाटेल हे अगदी नक्की, इतक्या सुरेख तर्हेने त्यांनी लिहिलं आहे. हाही लेख त्यांच्याच शब्दात वाचावा असाच आहे. तरीही यातल्या काही ओळी इथे देण्याचा मोह होतो..
'माझे एक ज्येष्ठ आदरणीय मित्र म्हणतात, या लेका दाण्डेकराला कुठें तरी गडावर मोहोरांचा हंडा सापडला असला पाहिजे.
मी तें मान्य करतो. म्हणतों, की मजबरोबर जे जे येतात, त्या सर्वांना मी सोन्याची एकेक मोहोर वाटीत असतो. पहाटेंस क्षितिजावरून डोकावणारी, आणि सायंकाळी तळाशी बुडी देणारी!'







0 comments:
Post a Comment